आय मिरर
महाराष्ट्रात सत्तांतर घडल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या सहा महिन्यात इंदापूर तालुक्यात विकास कामाच्या श्रेय्यावरुन भाजपा व राष्ट्रवादीत श्रेय्यवाद जुंपला आहे.मंजूर झालेली विकास कामे भाजपच्या माध्यमातून मंजूर झाल्याचा दावा करण्यासाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटील तालुकाध्यक्ष एडवोकेट शरद जामदार आघाडीवर आहेत.
त्याला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे,नुकतेच माजी झालेले जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ मंजूर विकास कामांसाठी केलेल्या प्रयत्नाचे पुरावेच जनतेसमोर मांडून भाजपने केलेल्या दाव्यांची पोलखोल करत असतात. जनता मात्र या सर्वांचे निरीक्षण करीत असून योग्य वेळी फुकटचे श्रेय्य घेणाऱ्यांना व दिशाभूल करणाऱ्या पक्षाला जागा दाखवण्याची खूणगाठ मनामध्ये बांधत आहे.
तालुक्यातील एखादे विकास काम मंजूर झाल्यास भाजप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह भाजपाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचे अभिनंदन करुन विशेष बाब म्हणून कामास मंजुरी दिल्याचे सोशल मिडियाव्दारे सांगत असते.यावर राष्ट्रवादी कडून आगपाखडं करीत प्रत्युत्तर दिले जाते.यावर जणू आता सर्जिकल स्ट्राईक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांच्या बेलवाडी गावातचं एक दोन नव्हे तर तब्बल ९ कोटीहून अधिक रक्कमेच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन रविवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी होणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एडवोकेट शुभम निंबाळकर आणि मयूर जामदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.
विशेष म्हणजे या गावच्या विद्यमान सरपंच देखील भाजपच्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील विकास कामांवर दावे ठोकणाऱ्या भाजप कडून त्यांच्याच तालुकाध्यच्या गावात होणाऱ्या विकास कामात श्रेय्यवादाच्या लढाईत आपण मागे पडू नये यासाठी कोणती रणनिती आखली जाणार याकडे राष्ट्रवादीसह जनतेचे लक्ष लागले आहे.
येणाऱ्या काळात तालुक्यातील प्रत्येक गावात सुरु असणाऱ्या केंद्र व राज्याच्या संयुक्तपणे सुरू असणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामाच्या श्रेय्यावरुन दोन्ही पक्षामध्ये चांगलीच जुंपणार आहे. भाजप कडून लवकरचं तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या गावातील जलजीवन व इतर विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम लवकरचं घेणार असल्याचे ही भाजप कडून सांगण्यात येत आहे. मात्र तत्पूर्वीचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून खा.सुप्रिया सुळे व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उद्घाटन आणि भूमिपूजनाचा धडाकाचं लावला आहे.भाजप कडून अनेक विकास कामांवर जरी दावा केला जात असला तरी अद्याप पर्यंत एकाही मोठ्या विकास कामाचे भूमिपूजन अथवा उद्घाटन केल्याचे दिसून येत नाही.