आय मिरर
मुलाने मुलगी पळवून नेल्याच्या रागात वडिलांसह कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत असून पती, पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह 3 मुलांचे मृतदेह भीमा नदीत सापडले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगावमध्ये ही घडना घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
मयताच्या मुलाने मुलगी पळवून नेली होती. त्याने मुलगी परत न आणल्याने वडिलांसह अन्य 6 जणांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुटुंबाने पारगाव मध्ये भीमा नदीत आत्महत्या केली असा अंदाज पोलीसांकडून लावला जात आहे. पती-पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह त्यांच्या 3 लहान मुलांचे मृतदेह भीमा नदीत सापडले आहेत.
घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलीस चौकशीनंतर आत्महत्या असल्याचा अंदाज लावला जात आहे. 17 जानेवारीच्या रात्री 7 जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी यातील चार मृत व्यक्तींची नावे आहेत. शाम आणि राणी फुलवरे यांची तीन मुले गायब होती. त्याचा मृतदेह देखील आज भीमा नदीत सापडले आहेत.
मंगळवारी 17 जानेवारी रोजी रात्री अकरानंतर वाहनाने निघोज या गावातून निघाले होते. शिरूर – चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि 22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आणि आज तीन मुलांचे आढळून आले आहेत. मात्र ही आत्महत्या असेल आणी भावाने मुलगी पळवून नेली म्हणून बहिणीने तिच्या पती आणि मुलांसह आत्महत्या का केलीय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.