“कोयना नदीमध्ये हा मासा सापडतो. कृष्णा, पंचगंगा नदीमध्येसुद्धा हा मासा सापडतो; परंतु या माशाच्या संख्येमध्ये मागील १० ते १५ वर्षात लक्षणीय घट झाली आहे. नदीच्या काही भागांतून हा मासा नामशेष झाला आहे. पूर्ण वाढ झालेला मासा ३० सेंमीपर्यंत लांब आणि वजनाला ५०० ग्रॅमपर्यंत भरतो. त्यामुळे नदीतील मासेमारीमध्ये हा प्राधान्याने पकडला जातो. अतिजंगलतोड, प्रदूषण आणि शहरीकरणामुळे नद्यांच्या पाण्यामध्ये रासायनिक बदल होत आहेत. या बदलांमुळे नकटा मासा नामशेष होऊ लागला आहे. या माशाविषयीची विशेष जीवशास्त्रीय माहिती उपलब्ध नाही.” डॉ. रणजित मोरे (मत्स्य अभ्यासक, प्राणिशास्त्र विभाग, कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर)
इंदापूर : आय मिरर
उजनी जलाशयात भिगवण मासळी बाजारात परिक्षण करत असताना दुर्मिळ नकटा जातीचा मासा आढळून आला.महाराष्ट्राच्या काही भागांत या माशाला नकटा या नावाने ओळखले जाते, ते त्याच्या नाकावर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शिंगासारख्या आकारामुळे काही लोक याला शेंदऱ्या या नावाने सुद्धा ओळखतात, कारण त्यांचे पर लालसर- शेंदरी रंगाचे असतात.
रोहू माशासारखाच शरीराचा आकार लांब आणि थोडासा गोलसर चपटा, डोके अत्यंत वेगळे. नाकाचा भाग एकशिंगी गेंड्यासारखा, निमुळत्या तोंडाच्या वर नाकावरून एकदम पुढे आलेला जाडसर शिंगासारखा भाग दिसतो. हा या माशाचा वेगळेपणा आहे. हा शिंगासारखा भागसुद्धा दोन भागांत विभागल्यासारखा भासतो. या शिंगावर खूप टेंगळे असतात आणि छोटी-छोटी छिद्रे असतात. हा भाग फुगीर आणि लालसर दिसतो. दोन्ही ओठांची रचना अशा पद्धतीने झालेली असते की, तौड खालच्या बाजूला वाटते. खालचा ओठ मात्र वरच्या ओठाच्या पुढे असल्यासारखा दिसतो. वरच्या जबड्यापासून दोन छोट्याशा स्पर्शिका दिसतात. डोळे मोठे असतात. पाठीवरचा पर मोठा असून ८ ते ९ छोट्या काट्यांनी त्याला आधार दिलेला असतो. शेपटीचा पर दोन समान भागांत विभागलेला असतो.
शरीरावरील खवले आकाराने मोठे असतात. खवल्यांवर लालसर रंगाचे उसे दिसतात. शरीराच्या दोन्ही बाजूला खवल्यांवरून जाणारी एक सरळ रेषा डोक्यापासून शेपटीपर्यंत जाताना दिसते. या रेषेवरील खवल्यांची संख्या मोजली, तर साधारणपणे ३७ ते ३८ एवढी भरते.
जिवंत माशाचा रंग चंदेरी काळसर, सर्व पर लालसर दिसत असले तरी शेपटीचा पर मात्र राखाडी रंगाचा असतो. महाराष्ट्रातल्या खूपशा नद्यांमध्ये हा मासा मिळत असल्याची नोंद असली, तरी सध्या मात्र हा मासा फारसा दिसत नाही.
फोटो :- उजनी जलाशयात आढळलेला नकटा जातीचा मासा