इंदापूर : आय मिरर
कोविडच्या जागतिक संकटानंतर जगातील सर्वाधिक गतीने भारताची अर्थव्यवस्था विकसित होत असून जगाच्या अर्थव्यवस्थेच्या पुनर्जीवनासाठी भारत देश इंजिन म्हणून काम करेल, असे गौरोदगार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी काढले.इंदापुरात शनिवार दि. २४ रोजी त्यांनी गुरुकृपा सांस्कृतिक भवनात डॉक्टर, वकील, व्यवसायिक नवमतदार युवकांशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ. संदेश शहा,अँड. कृष्णाजी यादव,व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार गुजर आदींनी वेगवेळ्या समस्या मांडल्या या सर्व समस्या संबंधित खात्याकडून अभ्यास करून निर्णय घेतले जातील अशी ग्वाही अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी दिली.भारताची अर्थव्यवस्था सर्वाधिक गतीने विकसित होत असून जगाच्या आर्थिक व्यवस्थेला पुढे नेण्यासाठी इंजिन बनेल असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
महागाई बाबत बोलताना अर्थमंत्री निर्मला सितारामण म्हणाल्या की, रोजच्या वापरातील वस्तूंची महागाई कमी करणे हे एक आव्हान आहे. मात्र त्यावर देखील केंद्र सरकार काम करत असून महागाई आटोक्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र नागरिकांनी देखील महागाईची प्रमुख कारणे समजून घेतली पाहिजेत. परदेशातून आयात करणाऱ्या वस्तूंची किंमत वाढली की महागाई वाढत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी आग्रह असतो. आयात करणाऱ्या फर्टीलायझर खतांच्या एका गोणीची किंमत तीन हजार रुपयांवर गेली होती. मात्र त्याचा आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडू नये यासाठी मोदी यांनी खास सूचना केल्याचे निर्मला सितारामण यांनी सांगितले.
पेट्रोलच्या सततच्या दरवाढीविषयी देखील पंतप्रधानांनी लक्ष घालून दर कमी करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यामुळेच जूनमध्ये पेट्रोलचे दर कमी झाले आहेत. व दिवाळीपूर्वी दर आणखी कमी होणार असल्याचे सुतोवाच निर्मला सितारामण यांनी केले. मात्र हे दर नेहमी कमी जास्त होत असतात कारण जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑइल चे दर वाढले की पर्यायाने त्याचा परिणाम आपल्या बाजारपेठेवर होतो. त्यामुळे ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जीएसटी बाबत देखील नेहमी अपप्रचार केला जातो. त्यासाठी केंद्राला जबाबदार धरले जाते मात्र त्याची सत्यता पडताळून पाहिली जात नाही. जीएसटी ठरविताना देशातील सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची एक समिती गठित केली आहे. त्या समितीकडून आलेल्या अहवालाचा तीन वेळा विचार करून त्यावर अभ्यास करून जीएसटी बाबतचा अंतिम निर्णय घेतला जातो. मात्र याचे सर्व खापर केंद्रावर फोडले जाते. असे सितारामण म्हणाल्या.
दरम्यान अर्थमंत्री सितारामण या हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगलो निवासस्थानापासून दुचाकी रॅली काढत जनतेला अभिवादन करत गुरुकृपा संस्कृतीक सभागृहापर्यंत दाखल झाल्या. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,आमदार राम शिंदे, आमदार राहुल कुल ,भीमराव तापकीर,बाळा भेगडे, गणेश भेगडे, अंकिता पाटील-ठाकरे, राजवर्धन पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी केले. तर आभार शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.