आय मिरर
जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याला भाकरीतून विष देऊन मारल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गुलाब मुबारक मुलाणी यांच्या फिर्यादीवरुन आता इंदापूर पोलिसांत ताहीर कलिंदर शेख, दिलशाद ताहीर शेख आणि शमा ताहीर शेख (सर्व रा. वनगळी, ता. इंदापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, ८ जानेवारी रोजी घराच्या अंगणात फिर्यादीचा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा नेहमी प्रमाणे मोकळा सोडला होता. अचानक रात्री तो जोरजोरात ओरडू लागला. बाहेर जावून पाहिले असता तो अंगणात भाकरी खात होता. दरम्यान घराच्या पाठीमागून कोणतरी पळून जात असल्याचा आवाज आला.तक्रारदार व त्यांच्या पत्नी यांनी पाठीमागे जावून पाहिले असता वरील तीन व्यक्ती दिसून आल्याचं फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर उपचारार्थ बोलावण्यात आलेल्या जनावरांच्या खाजगी डॉक्टरांनी कुत्र्याला विषबाधा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादी यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे.या प्रकरणाचा इंदापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.