आय मिरर
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये विकास कामाच्या श्रेय वादावरून चांगलीच जुंपली असून तालुक्यातील बेलवाडी या ठिकाणी रविवारी २२ जानेवारी रोजी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस कडून 9 कोटीहून अधिक रकमेच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडणार आहे. मात्र याचं श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊ नये यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा नारळ फुटण्यापूर्वीच बेलवाडी गावातील जवळपास पाच कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ केला.
नवनिर्वाचित सरपंच सौ.मयुरी शरद जामदार यांच्या हस्ते आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थीतीत ही भूमिपूजने करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष शरद जामदार यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता टीका केली. त्यामुळे भाजपचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार दत्तात्रय भरणे यांच्यातील श्रेय्यवादाची लढाई आता अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
यावेळी अर्जुन जामदार, शहाजी शिंदे,सर्जेराव काळे, तानाजी मुळीक, प्रकाश जामदार,ग्रामपंचायत सदस्य अनिल खैरे,स्वाती जामदार, अंबिका यादव,प्रताप पवार, सुप्रिया गायकवाड, ज्योतिराम जामदार,सुरेश भिसे, महेश भोसले,विनायक जामदार, विजय पवार,संजय पवार, यशवंत जामदार,पोपट यादव,प्रवीण शेळके,सुजित गायकवाड, जगदीश शिर्के ,सागर शिर्के,सागर पवार,नितिन सोनवणे,हनुमंत जामदार,सोमनाथ काळे आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्त उपस्थित होते.
जल जीवन मिशन सोबतच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या जवळपास पाच कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ आम्ही करत असल्याचं जामदार यांनी म्हटलं आहे.हर घर जल योजनेसाठी केंद्र सरकारचा 60 टक्के आणि राज्य सरकारचा 40 टक्के निधी असून केंद्रात आणि राज्यात ही भाजपाचे सरकार आहे.त्यामुळे या योजनेचा शुभारंभ आम्ही केला असून लवकरचं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेणार असल्याचं ही शरद जामदार यांनी म्हटले आहे.
विरोधकांची संध्याकाळी फार मोठी जाहिरात बाजी आहे.मात्र गेल्या पाच वर्षाची दर्जाहीन कामे केलेली आहेत ज्या कामांचा कुठेही ताळमेळ नाही अशा नव्या नवरीला जुनी साडी नेसवून उद्घाटने करण्याचा घाट विरोधकांकडून घातला जात असल्याची टीकाही शरद जामदार यांनी केली आहे. सध्या केंद्रात आणि राज्यातही सरकार आमचा आहे आणि ही योजना आमच्या सरकारने राबवली आहे त्यामुळे याचे भूमिपूजन आणि उद्घाटन ही आम्हीच करणार असा दावा ही जामदार यांनी ठोकला आहे.
जामदार म्हणाले की या योजनेतून संपूर्ण बेलवाडी सह वाड्या वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.या योजनेबाबत विरोधकांकडून नागरिकांमध्ये चुकीचा प्रसार केला जात असून आमचा खासदार आहे आमचा आमदार आहे आम्ही आराखडा बनवला असं सांगितलं जात आहे.पाण्याचा टँकर जरी घ्यायचा असेल तरी आमदाराची सही लागते. परंतु तुमच्या तोंडामध्ये जो पाण्याच्या टँकरचा शब्द आहे ते घालवण्याचे काम मोदी सरकारने केलं आहे.त्यामुळे तुमच्या सहीची कुठल्याही योजनेला आवश्यकता असणार नाही असा टोला जामदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता लगावला आहे.
योजनेचा आराखडा मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती गठीत केली असून त्या समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी केवळ आराखडा केला आणि तो प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला. त्यास पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंजुरीतून ही योजना होत असून या योजनेचे श्रेय हे भारतीय जनता पार्टीचा आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सरपंच सौ.मयुरी शरद जामदार यांच्या हस्ते या योजनेचा आम्ही शुभारंभ केला असल्याचं जामदार यांनी म्हटलं आहे.