या घटनेतील मयत सौरभ वाघमारे हा आंबेगाव पठार येथे २१ एप्रिल रोजी संग्राम लेकावळे या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी होता. या खुनाच्या प्रकरणी सौरभ याला अटक करून बालसुधारगृहात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याची जामीनावर सुटका झाली होती.
पुणे || पुण्यामधील पर्वती पायथा येथे पूर्ववैमनस्यातून रविवारी रात्री भररस्त्यात एका १७ वर्षीय आरोपीचा खून करण्यात आला आहे. आंबेगाव पठार येथे मागील महिन्यात एका तरुणाचा खून झाला होता. त्या गुन्ह्यातील १७ वर्षीय आरोपी जामीनावर आला होता. या आरोपी तरुणाचा (रविवार, १३ जून २०२१ रोजी) रात्रीच्या सुमारास पर्वती पायथा येथे सहा जणांनी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची माहिती मिळत आहे.
सौरभ वाघमारे वय असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभ वीर ऊर्फ मोन्या, अक्षय वीर, वृषभ दत्तात्रय रेणूसे, सचिन ऊर्फ दादा पवार, आकाश नावडे आणि स्वामी कांबळे या आरोपींनी सौरभ वाघमारेचा खून केला असल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पायथा येथे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सौरभ वाघमारे मोबाईल खरेदीसाठी गेला होता. त्यावेळी तिथे सौरभ वीर त्याचा सख्खा भाऊ अक्षय वीर आणि इतर चारजण दबा धरून बसले होते. सौरभ वाघमारेला पाहताच या सहा जणांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. सौरभ रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हे आरोपींनी हातात कोयता घेऊन आसपास असलेल्या नागरिकांवर धावून जात, कोणी याला वाचविलं तर तुम्हाला देखील मारून टाकू, अशी धमकी देऊन घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर सौरभ तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु आहे.