“आमच्यासाठी शिंदे फडणवीस सरकारसाठी हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे.अर्थसंकल्पात ३५० कोटी रुपयांची ऐतिहासीक किल्ले गढ संवर्धनासाठी तरतूद करण्यात आली आहे.त्यानुसार इंदापूर मधील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धासाठी पर्यटन विभागाकडून २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधिवेशनात दिले. तात्काळ आरखडा केला जाईल,दोन महिन्याच्या आत इंदापूर मधील असणाऱ्या गढीवर शासन स्तरावरुन मी स्वतः उपस्थित राहून बैठक लावली जाईल.शिवाय इंदापूर मधील वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी सात दिवसाच्या आत पर्यटनस्थळ म्हणून घोषीत केली जाईल. या गढीची जागा संरक्षित राहण्यासाठी शासनाकडून तात्काळ पावले उचलली जातील.असे आश्वासन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भरणे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना दिले”
आय मिरर
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासीक इंदापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन होण्यासाठी वीरश्री मालोजीराजे भोसले यांचा इतिहास तरुणांपुढे कायम ज्वलंत ठेवण्यासाठी विधानभवनात सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार दत्तात्रय भरणे यांनी लक्षवेधी मध्ये प्रश्न उपस्थित केला आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेत या ठिकाणचा ऐतिहासीक ठेवा सरकारने जनत करुन त्याठिकाणी वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे.
भरणे म्हणाले की, इतिहासाची साक्ष असणाऱ्या आणि इंदापूरच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी शासनाने वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या या ऐतिहासीक गढीचे संवर्धन करावे.या ठिकाणी असणारे जुने बुरूज,गाववेस, भुयारी मार्ग याचे पुनर्जिवन करावे अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.नवीन पिढीला इतिहास ज्ञात व्हावा यासाठी या ठिकाणी वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे स्मारक निर्माण करावे.या ठिकाणी त्यांच्या पादुकांसाठी दगडी मुळ स्वरूपात चबुतरा उभारला गेला पाहिजे.यासाठी महसूल, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक लावावी.शासन स्तरावर आराखडा तयार करावा.शिवाय गढीची जागा अतिक्रमण होऊ नये म्हणून शासनाने ताब्यात घ्यावी अशी मागणी भरणे यांनी केली आहे.
वीरश्री मालोजीराजे भोसले यांना निजामशाहीत अनेक गांवे वतन दिली होती.त्यापैकी इंदापूर एक होते.शेवटच्या क्षणापर्यंत मालोजीराजे भोसले इथे वास्तव्यास होते.याचा उल्लेख शिवभारत या ग्रंथात आढळतो.इ.स.वी.सन १६०६ मध्ये इंदापूरमध्ये जे युध्द झाले त्यात त्यांना वीरमरण आले.
ज्या ठिकाणी वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे वास्तव्य होते त्या ठिकाणी आता जुनी तहसीलदार कचेरी आहे.याच गढीच्या समोर इंद्रेश्वराचे मंदीर असून इंदापूरचे ग्रामदैवत म्हणून त्याची ओळख आहे.याच इंद्रेश्वराच्या दर्शनाने वीरश्री मालोजीराजेंच्या दिनक्रमाची सुरवात होत असायची अशी नोंद आढळते.
उजनी जलाशय हा मोठा आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण या ठिकाणी आहे. याशिवाय कुंभारगांव, भिगवण, गंगावळण,शहा परिसरात पर्यटक हे फ्लेमिंगो पाहण्यासाठी येत असतात. जर या ठिकाणी इतिहासाची साक्ष असणाऱ्या वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन पुनर्जिवन झाले तर भावी पिढीला याचा फायदा होणार आहे.