मुंबई : आय मिरर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनुसार पक्षातील सर्व विभाग आणि सर्व सेल बरखास्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्याचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयाने या माहितीला दुजोरा दिला आहे.
सोशल मीडियावर पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्या सहीच पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बसखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली असून त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे सगळे सेल देखील बरखास्त करण्यात आले आहेत. पक्षाच्या या पदांवर लवकरच नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. या बरखास्तीचे पत्र पक्षाच्या सगळ्या सेलच्या प्रमुखांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांच्याकडून पाठवण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीचे ‘सुपर 100’
राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता जाताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील 100 विधानसभा मतदारसंघात ‘सुपर 100’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यासाठी ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा निरीक्षक यादी’ जाहीर करण्यात आली आहे. ज्यांची विधानसभा निरीक्षक पदासाठी निवड झाली आहे ते आपापल्या मतदारसंघात पक्ष वाढीसाठी काम करतील. सोबतच सरकारच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्याच कामसुद्धा त्यांच्यामाध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात विरोधीपक्ष म्हणून सक्षमपणे काम करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरु झाली आहे.